चंद्रपूर, दि. 9 मे : सफाई कर्मचारी हा अतिशय गरीब वर्ग आहे. शहर स्वच्छतेत त्याची मोलाची भुमिका असते. तो आपले काम अतिशय प्रामाणिकपणे करतो. या कामाच्या भरोश्यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वच्छतेचे पुरस्कार मिळतात. त्यामुळे सफाई कर्मचा-यांच्या कामाची जाणीव ठेवून अधिका-यांनी त्यांच्या अडीअडचणी सकारत्मकतेने आणि संवेदनशीलपणे सोडवाव्यात, अशा सुचना राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग डागोर यांनी केल्या.
सफाई कर्मचा-यांच्या विविध प्रश्नांबाबत नियोजन सभागृह येथे आज (दि.9) घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, पालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, आदी उपस्थित होते.
कोरोना काळात जीवावर उदार होऊन सफाई कर्मचा-यांनी अहोरात्र काम केले, असे सांगून श्री. डागोर म्हणाले, विविध आस्थापनांमध्ये वारसान तत्वावर सफाई कर्मचा-यांच्या नोकरी संदर्भात तात्काळ निर्णय घेऊन त्यांना रुजू करून घ्यावे. शासन निर्णयानुसार नियुक्तीची जी मुदत आहे, त्या कालावधीत सफाई कर्मचा-यांना नियुक्ती देणे बंधनकारक आहे. श्रमसाफल्य योजनेंतर्गत सफाई कर्मचा-यांच्या घरकुलासाठी प्रस्ताव घेऊन त्यांना घरे उपलब्ध करून द्यावीत. तसेच जमिनीचे पट्टेसुध्दा देण्यात यावे.
पुढे ते म्हणाले, सफाई कर्मचा-यांची नियमितपणे आरोग्य तपासणी करावी. त्यासाठी महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायतीने आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे. आयुष्मान भारत योजनेचा लाभ देऊन त्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शासनाच्या इतरही योजनांचा लाभ सफाई कर्मचा-यांना द्यावा. एखाद कर्मचारी निवृत्त झाला तर त्याचे सर्व लाभ वेळेवर मिळाले पाहिजे, उगाच यात अडचणी निर्माण करू नये. सफाई कामगारांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी जिल्हास्तरावर एक समितीचे गठन करावे. तसेच यात अशासकीय सदस्यांचा समावेश असावा, अशा सुचना अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी केल्या.
बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, नुतन सावंत यांच्यासह सर्व नगर पालिका नगर पंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
००००००
0 Comments